बटाटा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल कमी   

मंचर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले शिरदाळे परिसरामध्ये भांडवली खर्च असल्यामुळे बटाटा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. भांडवली खर्च जास्त आणि बाजारभावाची शास्वती नसल्यामुळे बटाटा लागवडीकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे.
 
मे महिन्यात झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदी असून पावसाने सुरवात चांगली केल्यामुळे आणि तीन चार दिवसांची उघडीप दिल्यामुळे ९० टक्के कडधान्याची पेरणी पूर्ण झाली असून पुढील दोन दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होणार आहे. ज्या क्षेत्रावर बटाटा लागवड करायची आहे. तेच क्षेत्र बाकी आहे, परंतु यंदा देखील बटाटा लागवडीत मोठी घट होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. बाबाजी चौधरी, निवृत्ती मिंडे, सुरेश तांबे, कचर तांबे हे शेतकरी वगळता बाकी शेतकर्‍यांची बटाटा लागवड ही कमी प्रमाणात असणार आहे. तर भांडवल खर्च जास्त असल्यामुळे आणि उत्पन्न कमी यामुळे बटाटा लागवडीचे प्रमाण कमी झाल्याचे कांताराम तांबे, कोंडीभाऊ तांबे, राघू रणपिसे, संभाजी सरडे, केरभाऊ तांबे या शेतकर्‍यांनी सांगितले.
 
शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय वाढल्यामुळे शेतात जनावरांचा चारा असून त्यामध्ये मका पिक करण्यावर शेतकर्‍यांचा कल असल्याचे दूध उत्पादन शेतकरी शुभम तांबे,सचिन तांबे, ज्ञानेश्वर तांबे, सुरेश तांबे शेतकर्‍यांनी सांगितले. त्याचबरोबर सोयाबीन, उडीद, मूग, वाटाणा आणि भुईमूग पेरणी करण्यात आली असल्याचे मच्छिंद्र चौधरी, तात्याभाऊ चौधरी, निवृत्ती तांबे या शेतकर्‍यांनी सांगितले. 
 
पाऊसमान चांगले झाल्यामुळे शेतकर्‍यांचा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करण्यावर भर असून बैलांची शेती बुडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असून पेरणीसाठी ट्रॅक्टर अपुरे पडत असल्याचे ट्रॅक्टर व्यावसायिक बाळासाहेब रणपिसे, भुपेंद्र तांबे, श्रीकांत मिंडे, सुहास रणपिसे, राजेंद्र चौधरी, संतोष तांबे यांनी सांगितले.
 
बटाटा लागवडीला भांडवल जास्त असल्यामुळे कमी प्रमाणात लागवड होत असून पीक हातात येईपर्यंत गोळाबेरीज केली, तर हातात येणारे उत्पन्न हे देखील खूप कमी असते. शिवाय मजुरांचा तुटवडा, खतांच्या महागलेल्या किंमती यामुळे देखील एकेकाळी बटाटा आगार अशी ओळख असलेले आमचे शिरदाळे गावातील शेतकरी बटाटा लागवड करायला म्हणावे तशी हिंम्मत करत नाहीत. 
 
- मयुर संभाजी सरडे, माजी उपसरपंच शिरदाळे
 

Related Articles